| अलिबाग | प्रतिनिधी |
जनता शिक्षण मंडळाचे, ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग येथे विधीतरंग 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा मा. डॉ. साक्षी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, महाविद्यालयातून विधी पदवी प्राप्त केलेले आणि अलिबाग नगरपरिषदेच्या 2025 च्या झालेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहा यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ॲड. मानसी म्हात्रे ( सदस्य), ॲड. श्वेता पालकर, ॲड. निवेदिता वाघमारे, ॲड. अश्विनी ठोसर, ॲड. अंकित बंगेरा, ॲड. ऋषिकेश माळी आणि ॲड. संदीप पालकर यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ॲड. मानसी म्हात्रे यांनी लोकनेते ॲड. दत्ता पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, “ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज म्हणजे आदरणीय दादांचे चेंबर आहे, जिथे आम्हाला कायद्यासोबतच सामाजिक जाणीवेचे बाळकडू मिळाले.“ तर ॲड. अंकित बंगेरा यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करत महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. ॲड. गौतम पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटवावा. आज लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले हे माजी विद्यार्थी सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. नीलम हजारे यांनी केले, तर सूत्रसंचालन आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. नीलम म्हात्रे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. संदीप घाडगे यांनी केले. या सोहळ्याला जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, विधी महाविद्यालयातील प्रा. पियुषा पाटील, प्रा. चिन्मय राणे, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






