| पनवेल | प्रतिनिधी |
महापालिका व निवडणूक यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या निवडणूक कामांमुळे महिला कर्मचारी अक्षरशः त्रस्त झाल्या आहेत. त्यांचा वाढता ताण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचारी, महिला शिक्षिका तसेच खासगी शिक्षण संस्थांतील महिला कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर निवडणूक कामात समावेश करण्यात आला आहे. मात्र, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली कामे, सतत बदलणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अपुरी विश्रांती यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशिक्षण, मतदार यादी तपासणी, मतदान केंद्र व्यवस्थापन, साहित्य वाटप आदी विविध जबाबदाऱ्या महिलांवर सोपविण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी प्रवासाची गैरसोय, सुरक्षिततेचा अभाव, वेळेचे कोणतेही ठोस नियोजन नसणे यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विशेषतः विवाहित महिला कर्मचाऱ्यांना घरगुती जबाबदाऱ्या, लहान मुलांची काळजी आणि त्यातच निवडणूक कामाचा वाढता भार यांचा ताळमेळ साधताना मानसिक व शारीरिक थकवा सहन करावा लागत आहे. महिला कर्मचारी व शिक्षिकांनी प्रशासनाकडे कामाचे वेळापत्रक नियोजनबद्ध ठेवावे, सुरक्षित वाहतूक व विश्रांतीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.







