| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
महाड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कार्यरत असलेल्या 50 वर्षीय व्यवस्थापकाने आपल्या 25 वर्षीय महिला कामगाराला केबिन व नंतर घरी बोलावून विनयभंग करत जबरदस्ती मिठी मारत अश्लील वर्तन केल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणामुळे महाड तालुका हादरून गेला असून जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत पीडित महिला कर्मचारी काम करते. काही दिवसांपूर्वी कंपनीचे व्यवस्थापकांनी तिला कामाच्या निमित्ताने आपल्या केबिनमध्ये बोलावले होते. परंतु, ती पोहोचल्यावर व्यवस्थापक केबिनमध्ये नव्हते. त्यानंतर तिने मोबाईलवरून विचारणा केली असता आरोपी व्यवस्थापकाने थेट आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले. कंपनीच्या कामाबाबत चर्चा असल्याचे सांगत पीडित महिला तातडीने आरोपीच्या महाड शहरातील घरी गेली. त्यावेळी आरोपी व्यवस्थापकाने तिच्या मनाविरुद्ध तिच्या पोटाला, कंबरेला हात लावून मिठी मारली. महिलेने ढकलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तरी आरोपीने पाठीमागून मिठी मारत अश्लील बोलणे सुरू केले. या घटनेनंतर पीडित महिलेने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही रसायनी पाताळगंगा एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत महिला कामगाराचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा अशाच स्वरूपाचा प्रकार समोर आल्याने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच, या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिला कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनी व्यवस्थापनाने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही कामगार वर्गातून पुढे येत आहे.
महाडमध्ये महिला कामगाराचा विनयभंग

Oplus_131072