प्रशासनाच्या दिरंगाईवर संताप
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमधील 36 एकर क्षेत्रफळ असलेल्या एल्फिन्स्टन बंगल्याच्या आवाराभोवती नव्या मालकाने तारेचे जाळीदार कुंपण उभारल्याने परिसरातील जंगली प्राण्यांच्या पारंपरिक वाटा बंद झाल्याचा आरोप होत आहे. या कुंपणामुळे भेकर, रानडुक्कर, ससे, मुंगूस, शेकरू, कालिंदर यांसारख्या वन्यजीवांच्या मुक्त संचारावर मर्यादा आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित कुंपण तातडीने हटवावे, अशी मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माथेरान उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी नगरपरिषद व वन विभागाला लेखी निवेदन देत या प्रकरणात तातडीची हस्तक्षेपाची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त करत विलंबामागे ‘अर्थकारण’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
माथेरानचा बहुतांश परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. ब्रिटिशकालीन अनेक बंगले वनराईत विसावलेले आहेत. या नैसर्गिक अधिवासात वन्यजीवांचा मुक्त वावर असतो. मात्र, एल्फिन्स्टन बंगल्याभोवती उभारलेल्या कुंपणामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक हालचालींना अडथळा निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केवळ पाहणी करून विषय बाजूला ठेवल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.
स्थानिक माळी कामगारांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “आम्ही अनेक वर्षांपासून या बंगल्यात काम करत आहोत. या भागात मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचा वावर असतो. कुंपणामुळे त्यांच्या वाटा बंद झाल्या आहेत. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात काही अधिकारी व राजकीय मंडळींचा संगनमताने हातभार लागल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ‘चिरीमिरी’मुळेच कारवाई टाळली जात असल्याचा संशय व्यक्त होत असून, अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधींपेक्षा वरचढ होत असल्याची चर्चा आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात गावासाठी गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, याप्रकरणी लवकरच रायगड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती सादर करण्यात येणार असल्याचे संतोष शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. वन्यजीवांच्या हितासाठी कुंपण तातडीने हटवावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






