निर्माल्यापासून खतनिर्मितीचा ध्यास

। नवी मुबंई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध विभाग कार्यालयांअतर्गत धारण तलाव येथे गणेश विर्सजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने हार, फुलांचे मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होत आहे. त्यामुळे तलाव प्रदूषित होण्याचा धोका असल्याने या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी शेकडो दासभक्त अहोरात्र झटत आहेत.

गणेश विसर्जनासाठी पालिकेने विभागावर व्यवस्था केली आहे. या विसर्जन स्थळांवर निर्माल्य गोळा करण्यासाठी पालिकेकडून व्यवस्था केली आहे. तरी सुद्धा काही प्रमाणात तलावांमध्ये निर्माल्य टाकले जात असल्याने तलावांमधील पाणी प्रदूषित होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या निर्माल्यापासून खतनिर्मितीचे करण्याचे उद्दिष्ट कोपरखैरणे विभागातील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी आखले आहे. कोपरखैरणे येथे प्रतिष्ठानचे नारायण म्हात्रे व मोहन वेटा यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जात आहे. जमा होणार्‍या निर्माल्याचे श्रीसदस्य वर्गीकरण करून खत केंद्रावर नेत आहेत. यासाठी नवी मुंबई महापालिकचे कोपखैरणे विभागाचे अधिकारी प्रशांत गावडे व स्वच्छता अधिकारी दिनेश वाघुलदे यांची देखील मदत मिळत आहे.


विसर्जन स्थळावर जमा होणार्‍या हार-फुलांचे वर्गीकरण करून एका खड्डात जमा केले जात आहे. या खड्ड्यामध्ये शेण खतांसोबत फुलांचा लगादा टाकण्यात येणार आहे. त्यातून 45 दिवसात 500 किलो खत तयार करण्यात येईल. – नारायण म्हात्रे, सदस्य, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान

Exit mobile version