पालिकेच्या उद्यानविभागाकडून चार ठिकाणी वुड श्रेडिंग मशीन
| पनवेल | प्रतिनिधी |
पालिका हद्दीतील उद्यानात जमा होणाऱ्या पाळापाचोळ्याचे लवकरात लवकर विघटन करून त्यापासून खत निर्मिती करता यावी, यासाठी पालिकेकडून चार ठिकाणी वुड श्रेडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. यामुळे पाळापाचोळ्याच्या विघटनासाठी लागणारा वेळ कमी होणार असून, जास्तीत जास्त खत निर्मिती होणार आहे.
पनवेल पालिका हद्दीत समाविष्ठ सिडको वसाहतीमधील 55 उद्यानांचे पालिकेकडे हस्तांतरण झाले आहे. ही उद्याने सुशोभित करण्यासाठी पालिका प्रशासनाचे उद्यान विभाग काम करत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने वृक्षाची लागवड करण्यात आली असल्याने दररोज या ठिकाणी पालापाचोळा जमा होतो. उद्यानांमध्ये जमा होणारा पालापाचोळा गोळा करून त्यांचे विघटन करण्याच्या हेतूने उद्यानातच खत कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पालापाचोळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाते. मात्र या प्रक्रियेला पन्नास ते साठ दिवसाचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्याच्या हेतूने पालिका प्रशासनाकडून खारघर येथील सेक्टर 12 मधील भूखंड क्रमांक 1, कळंबोली सेक्टर 6 ई येथील भूखंड क्रमांक 2, कामोठे सेक्टर 20 येथील भूखंड क्रमांक 28+35+36 तसेच नवीन पनवेल सेक्टर 6 येथील भूखंड क्रमांक 9 अशा चार ठिकाणी वुड श्रेडिंग मशीन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वुड श्रेडिंग मशीनचा फायदा उद्यानात गोळा होणारा पालापाचोळा एकत्र करून वुड श्रेडिंग मशीनमध्ये त्याचा भुसा तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा भुसा खत कुंड्यामध्ये जमा केला जाणार आहे. अविघटित पालापाचोळ्यापेक्षा भुशाचे विघटन वेगाने होत असल्याने अत्यंत कमी कालावधीत उद्यानातच खत निर्मिती करणे सोपे होणार आहे.