चौलमळा येथे गुरुवारी आई कृष्णादेवीचा उत्सव

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन;
मनोरंजासाठी मुंबई येथील आनंदयात्री ऑर्केस्ट्रा

। चौल । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचा उत्सव सोहळा गुरुवार, दि. 2 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गावचे प्रमुख रवींद्र घरत आणि युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचा उत्सव सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्त गुरुवारी सकाळी आठ वाजता मुधकर नाईक यांच्या घरापासून देवीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर कृष्णादेवीच्या मंदिरात श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता चौलमळा कृष्णादेवी प्रासादिक मंडळाचे भजन होणार आहे. यावेळी बुवा चंद्रकांत नवगावकर यांना विकास पाटील आणि अजय वाडकर पखवाजाची साथसंगत करणार आहेत, अशी माहिती भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांनी दिली. तसेच, ग्रामस्थांच्या मनोरंजनार्थ मुंबई-मुलुंड येथील स्वरश्री प्रतिष्ठान प्रस्तुत आनंदायात्री हा मराठी, हिंदी गाण्यांसह नृत्याविष्काराचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, मानव सेवा हीच ईश्वरसेवा मानून अंध, अपंग, मतिमंद, मूकबधीर, ज्येष्ठ नागरिक, दुर्बल घटक आणि कर्करोग पीडितांच्या आर्थिक व शैक्षणिक मदतीसाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचे युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे बहुतांश कलाकार दिव्यांग आहेत. स्वरश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रद्धा देसाई (9870112437) आणि सचिव प्रमोद कांबळी (9220771267) यांचे पाठबळ या सर्व कलाकारांना मिळत आहे.

सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून, कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळातील सदस्य त्यासाठी मेहनत घेत आहेत. तरी, मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन गावप्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, भजन मंडळ अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, उपाध्यक्ष अंजेश घरत यांनी केले आहे.

Exit mobile version