समुद्र किनार्‍यांवर शुकशुकाट

भातशेतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यात जोरदारपणे पाऊस बरसत असून येथील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटक फिरकत नसल्याने शुकशुकाट पसरला आहे. तसेच, तालुक्यातील पाणथळ भागांतील भात शेतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हिवाळा, उन्हाळ्यात तालुक्यातील चारही समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ असते. पाऊस सुरू झाला की, समुद्र खवळत असतो. प्रसिद्ध काशीद समुद्रकिनार्‍यावर उतरण्यास पर्यटकांना मज्जाव असतो. पद्मजलदुर्ग आणि जंजिरा जलदुर्ग बंद असल्याने पर्यटकांची संख्या कमी होत जाते. त्यामुळे मुरूड, नांदगाव, बारशिव समुद्रकिनार्‍यावर पर्यटक फारसे फिरकत नाहीत. पावसाळ्यामुळे तालुक्यातील पर्यटन थंडावले आहे. तालुक्यातील फणसाड, गारम्बी, आंबोली, चिंचघर धारणातील जलाशय भरले असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून मज्जाव असल्याने पावसाळ्यातील पर्यटनदेखील पूर्णपणे रोडावल्याचे दिसून येत आहे. काशीद, मुरुड, बारशिव, नांदगाव आदी समुद्रकिनारी शनिवार, रविवारीदेखील पर्यटकांचा मागमूस दिसत नाही. येथील पर्यटन पूर्णपणे थंडावले असून पर्यटनावरूप अवलंबून असणारे व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.

यातच दोन महिने मासेमारी बंद असल्याने बाजारात मासळी मिळत नाही. त्यामुळे मांसाहारी पर्यटक मुरूडमध्ये येण्यास इच्छुक नसतात. पर्यटनासाठी मोजकेच पर्यटक हजेरी लावतात हे जरी खरे असले तरी निर्बंध आल्याने पर्यटक येण्यास नाखूश असतात किंवा सहजासहजी येण्यास तयार होत नाहीत अशी माहिती मुरूड येथील व्यावसायीक आणि सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली.

तसेच, तालुक्यातील बळीराजा धास्तावला आहे. टोकेखार, उसडी, नांदले गावापासून उसरोली, आदाड, वालवटी, वावे, विहूर, पंचक्रोशीतील गावापर्यंत पाणथळ भागांतील भातशेतींचे राब पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी राब कुजल्याने पुन्हा लावणी करण्यासाठी बियाणे मिळणे अवघड असल्याची माहीती शिघ्रे गावातील शेतकरी रघुनाथ माळी आणि वाणदे गावातील शेतकरी तुकाराम पाटील यांनी कृषीवल प्रतिनिधींशी बोलताना दिली. तसेच, मरूड तालुक्यात शनिवार पर्यंत 2139 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

काशीद समुद्रकिनार्‍यावर शुकशुकाट
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारा पर्यटकांतून अधिक लोकप्रिय असला तरी मागील काही वर्षांत येथे दुर्घटना घडल्या असल्याने पावसाळ्यात किनार्‍यावर उतरण्यास मज्जाव असतो. येथील सुमारे 50 स्टॉल्स बंद असतात. काशीद येथील सूर्यकांत जंगम यांनी सांगितले की, काशीद किनार्‍यावर सध्या पर्यटकांचा शुकशुकाट आहे. पर्यटक नसल्याने हॉटेल्स, लॉजिंगमध्ये वर्दळ नाही. तालुक्यात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असला तरी पावसाळ्यात मोठी मंदी दिसून येते.
Exit mobile version