‘त्या’ देवदूताने वाचविले पंधरा खलाशांचे प्राण

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील अतिश सदानंद कोळी आणि त्याच्या साथीदाराने आपल्या जीवाची बाजी लावून वादळात अडकलेल्या दोन बोटींवरील 15 खलाशांना सुखरूप करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे तो त्या 15 खलाशांचा देवदूत ठरला आहे.

नुकताच निर्माण झालेल्या चक्रीवादळाने रायगडमधील मच्छीमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारी बोटीचा संपर्क तुटला होता. त्यात करंजा येथील मच्छिंद्र नाखवा मालकाच्या महागौरी, नमो ज्ञानेश्वरी या दोन बोटींचाही संपर्क तुटला होता. त्या बोटींची वायरलेस यंत्रणा, जिपीएस यंत्रणाही बंद होती. त्या बोटींचे काय झाले, त्या बोटींवर 15 खलाशी आणि तांडेल कुठे आहेत, हे कोणालाच ठाऊक नव्हते. बोटमालक मच्छिंद्र नाखवा याने अनेक प्रयत्न केले. कोस्टगार्डकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. कोणताही सुगावा लागत नव्हता. फक्त मुंबईपासून आठ तास आत त्यांचे एकदा लोकेशन मिळाले होते. त्यानुसार बोट मालक मच्छिंद्र नाखवा याने करंजा येथील युवक अतिश सदानंद कोळी यांना या बोटीचा शोध घेण्यास पाचरण केले.

समुद्र खवललेला असताना आपल्या जीवाची परवा न करता अतिश कोळी, यांच्यासह भानुदास कोळी, बोट मॅनेजर आणि तांडेल असे चौघे जण 27 ऑक्टोबरला उरणच्या करंजा येथून बचावासाठी निघाले. बोटीवरील जिपीएस बंद पडलेला असल्याने मोबाईलच्या जीपीएसच्या सहाय्याने अतिश आणि त्याचे साथीदार जवळपास आठ तासांनी लोकेशनच्या ठिकाणी बोट घेऊन पोहोचले. परंतु, त्या ठिकाणी कोणत्याही बोटी आढळून आल्या नाहीत. शोध घेत असताना रात्रीच निघण्याचा साथीदारांच्या मनात आलं होतं. मात्र अतिशने आपण सकाळी शोध घेऊ, असे सांगून बोट त्याच ठिकाणी नांगरून ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी बीटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावर बोटी दिसून आल्या. मात्र परिस्थिती पाहता दोन्ही बोटी नादुरुस्त झालेल्या होत्या. एका बोटीचा गेर तुटले होते, तर दुसऱ्या बोटीच्या पंपचे काम निघाले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी बोटी वादलामध्ये एकमेकांना बांधून नांगरून ठेवल्या होत्या.

त्या दोन्ही बोटीवरील राजू सिंग, मनोज सरण, पंकज यादव, राजू गौतम, जगदीश, संतोष कुमार आणि आणखी ९ खलाशी चार दिवस कोणतेही अन्न न शिजवता फक्त बिस्किट आणि पाण्यावरती होते. खूप घाबरलेल्या, आजारी अवस्थेत असलेले खलाशी आपला जीव मुठीत धरून होते. कोणीतरी आपला जीव वाचविण्यासाठी देवदूत आला असल्याने ते बिनधास्त झाले.

अतिश आणि त्याच्या साथीदाराने बंद पडलेल्या दोन्ही बोटी त्यांनी नेलेल्या बोटिला दोरीच्या साहाय्याने बांधून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. वादळामध्ये दोन्ही बोटी एकमेकांना बांधून आणने खूप अवघड होते. अनेक अडचणींवर मात करीत 24 तास प्रवास करीत 15 खलाशी आणि दोन्ही बोटी घेऊन करंजा बंदरात दाखल झाले. त्या 15 खलाशांचा जीव वाजवणारा अतिश हा ‘देवदूत’ ठरला.

समुद्र खवलला होता. परंतु, 15 खलाशींचे जीव आपल्याला वाचत असतील तर आपण गेले पाहिजे, असे मनात आल्यावर आम्ही चार जण बोट घेऊन निघालो. आम्हाला सकाळी बोटी मिळाल्यावर खलाशी खूप घाबरले होते. चार दिवस वादळात असल्याने त्यांच्या पोटात काहीच अन्न नव्हते. फक्त बिस्कीट आणि पाणी पीत होते. परतत असताना 24 तास प्रवास करावा लागला, त्यातही खूप अडचणी आल्या. मात्र आम्ही करंजाला पोहचल्यावर एक मनाला समाधान मिळाले.

– अतिश कोळी, मच्छिमार, करंजा

आमच्या बोटी बिघडल्याने आम्ही चार दिवस वादळात बोटी नांगरून होतो. कधीही बोटी बुडतील अशी भीती वाटत होती. कोणीतरी वाचवयला देवदूत येईल, असे वाटत होते. आतिशच्या रुपाने एक देवदूतच आला आणि आम्हाला सुखरूप घेऊनही आला. खरंच तो देवदूतच आहे.

– संतोष कुमार, बोटीवरील खलाशी

Exit mobile version