। सातारा । वृत्तसंस्था ।
सातार्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली.
बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला असे समजते. दरम्यान, दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
सातार्यात रात्री सव्वा आठच्या आसपास सनी भोसले हा त्याच्या मित्रांसमवेत दुर्गा पेठेत गेला होता. याच ठिकाणी बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे. कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मारामारीत शस्त्रांचा वापर झाल्याचे चर्चा आहे.