। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा वसाहतीत दारूच्या दुकानासमोर सलग दोन मारहाणीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दारू खरेदी अथवा पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून अनोळखी युवकांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याचे उघड झाले असून, या दोन्ही प्रकरणांची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपी युवक पसार झाले असून, तळोजा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उघड्यावर मद्यपान करणारे व मद्यपींचा त्रास हा तळोजा परिसरातील रहिवाशांसाठी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न बनला आहे.
पहिल्या घटनेत तळोजा फेज-2 मधील कुणाल वाईन्ससमोर घडली. येथे 30 वर्षीय तरुण व त्याचा मित्र उभे असताना दोन अनोळखी युवकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी अॅल्युमिनियमच्या पट्टीने डोक्यावर, पाठीवर आणि हातांवर जबर मारहाण केल्याने दोघेही जखमी झाले. याच दिवशी रात्री दुसरी घटना घडली. खारघर येथे राहणारा 32 वर्षीय तरुण कुणाल वाईन्समधून दारू खरेदी करून घरी जात असताना दोन अनोळखी युवकांनी त्याला अडवले. ‘30 मिलीलीटर दारूचा पेग पाजणार नाही का?’ अशी मागणी आरोपींनी केली. मात्र दारू देण्यास नकार दिल्याने त्यांनी लाथाबुक्यांनी त्याला मारहाण केली. या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या बरगडी तुटल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या मारहाणीत आरोपींनी आपल्या हातातील सोन्याचे ब्रेसलेटही घेतल्याचा संशय पीडित तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. दोन्ही घटनांचा तपास तळोजा पोलीस करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. वाढत्या मद्यपी त्रासावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तळोजा वसाहतीमधील नागरिकरण झपाट्याने वाढत असून या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. नवी मुंबई पोलीस विभागाने पोलीस ठाण्यासाठी भूखंड मागणीचा प्रस्ताव सिडको मंडळाकडे दिला आहे. मात्र यासंदर्भात गतिमान पद्धतीने हालचाली होत नसल्याने पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव बासनात पडून आहे.
दारू न दिल्याने तळोजात दोन ठिकाणी हाणामारी
