| श्रीवर्धन | वार्ताहर |
सध्या डिसेंबर महिना सुरू झाल्यामुळे पर्यटकदेखील श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. लवकरच नाताळची सुट्टी सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांनी आपली हॉटेल बुकिंगसुद्धा या ठिकाणी केलेली आहेत. परंतु, ऐन हंगामामध्येच या व्यावसायिकांना आपला धंदा बंद ठेवावा लागलेला आहे. घोडागाडी चालक आणि सेंड बाईक चालक यांच्यामध्ये काही क्षुल्लक कारणावरून जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये चाबूक व काठ्यांचा सर्रास प्रमाणे वापर करण्यात आला.
यात काही व्यावसायिकांना दुखापती झाल्या होत्या. श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व व्यावसायिकांना आपले धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शनिवार व रविवार श्रीवर्धन येथे पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच ही गर्दी असतानादेखील आपले धंदे बंद राहिल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आपला मोर्चा आरावी समुद्रकिनार्याकडे वळवल्याचे पाहायला मिळाले.