माथेरानमध्ये दोन गटात हाणामारी; शहर प्रमुख-शहर संपर्क प्रमुख आमनेसामने

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान शहरातील शिवसेनेच्या शहर प्रमुख आणि शहर संपर्क प्रमुख यांच्या गटातील वाद चव्हाट्यावर आला असून हा वाद हमरीतुमरीवर पोहचला आहे. त्यात 25 जून रोजी हे दोन्ही गट सोशल मीडियावरील चर्चेने निर्माण झालेल्या वादाने एकत्र आले आणि त्यांच्यात मध्यरात्री हाणामारी झाली. माथेरान शिवसेनेतील शहर प्रमुख गटाने शहर संपर्क प्रमुख गटाच्या कार्यकर्त्याच्या घरी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला तर त्याबद्दल विचारणा केल्याने दोन्ही गटात माथेरान बाजारपेठेत हाणामारी झाली. दरम्यान, माथेरानमध्ये सध्या शांतता असून पोलिसांची अतिरिक्त कुमक माथेरानमध्ये तैनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे पडसाद माथेरानमध्ये शिवसेना शाखेच्या सोशल मीडिया ग्रुपवर उमटत होते. त्याच चर्चेतून शिवसेनेतील दोन गट पुन्हा एकदा सोशल मीडियावर आक्रमक झाले होते. त्याचे पडसाद मध्यरात्रीच्या सुमारास उमटले आणि त्यात शहरातील संत रोहीदासनगर येथील पौर्णिमा राजेश काळे यांच्या घरावर माथेरानमधील 14 जण पोहचले. त्यांनी यांच्या घराच्या समोर येवुन दरवाजा ढकलुन गैरकायद्याचा जमाव जमवला. तसेच तुम्ही घराच्या बाहेर या, तुम्हाला बघतो असे जोरजोराने आरडाओरडा करून फिर्यादी यांच्या घराच्या बाहेरील लाईटचे बल्प व बटन बोर्ड तोडुन टाकली. त्यावेळी संबंधित सर्वांना पौर्णिमा काळे यांच्या सासूबाई हातपाय पडून विनंती करीत होत्या. त्याबाबत त्यांनी माथेरान पोलीस ठाणे येथे जाऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक शिवसेना पक्षाचे आठ कार्यकर्ते आणि पाच ते सहा अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याशिवाय चंद्रकांत चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत माथेरान येथील प्रमोद बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट येथे शिवसेना पक्षाच्या राजकिय परिस्थितीबाबत केलेल्या सोशल मीडिया ग्रुपवर कमेंटबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावेळी चर्चेचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाले आणि नंतर हाताबुक्यांनी आणि लाथानी मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी केली. त्याबद्दल माथेरान पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यातील सर्वांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडले आहे.

Exit mobile version