सामना संपताच चाहत्यांमध्ये राडा

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

कोपा अमेरिका स्पर्धेतील उपांत्य फेरीत कोलंबिया विरुद्ध उरुग्वे संघात रोमांचक सामना गुरुवारी (दि.11) जुलै रोजी पार पडला. या सामन्यात कोलंबियाने जेफरसन लेर्माने केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेवर 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर स्टेडियममध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या वादाचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सदर व्हिडिओमध्ये सामन्यानंतर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली होती, ज्यात उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर डारविन नुनेजसह इतर खेळाडू देखील सामील झाल्याचे दिसून आले.

या सामन्यासाठी 70 हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते, यातील जवळपास 90 टक्के प्रेक्षक कोलंबियाचे समर्थक होते, पण काहीप्रमाणात उरुग्वेचे समर्थकही स्टेडियममध्ये होते. यावेळी सामन्यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. यानंतर उरुग्वेचे खेळाडू पायर्‍या चढत होते. यादरम्यान, ते देखील या वादात सामील झाले. त्यानंतर पोलिस आणि सुरक्षा रक्षकांना हे वाद सोडवण्यासाठी जवळपास 10 मिनिट लागले. दरम्यान, उरुग्वेचा कर्णधार जोस मारिया गिमेनेझने असे सांगितले की खेळाडू त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात होते. यानंतर दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटना कॉनमेबोल () यांनी या भांडणावर निराशा व्यक्त केली आहे. याबरोबरच पुढे याबाबत चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version