महामार्गावरील अपघातासाठी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा

व्यावसायिकांची पोलिसांकडे मागणी
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई – गोवा महामार्गावर अपघात होऊन कोणाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महामार्गालगत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनी तसेच रिक्षा वाहतूकदारांनी केली आहे.
चिपळूण पोलिस ठाण्यातयाबाबतचे निवेदन देण्यात आले. शहरातील गणपती मंदिर ते बहादूरशेखनाका मेनरोड सर्विस रोडचे खड्डे आठ दिवसात न भरल्यास चौपदरीकरणाचे काम थांबवण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
आमदार शेखर निकम, राष्ट्रीय महामार्ग विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना आज व्यापारी व रिक्षा वाहतूकदारांनी निवेदन दिले. त्यात असे म्हटले आहे की दसर्‍यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे भरण्यात आले. अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदारने केले. सगळीकडील रस्त्याचे काम पूर्ण झाले. परंतु, गणपती मंदिर ते बहादूरशेखनाका मेनरोड सर्विस रोडचे डांबरीकरण पूर्ण केले नाही.
येथील व्यापार्‍यांनी ठेकेदारांकडे चौकशी केली. अनेकवेळा विचारणा केली. पण गेली दोन महिने फक्त आश्‍वासन देण्यात आले. या वेळी नितीन लोकरे व रामशेठ रेडीज यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन खड्डे भरण्याची मागणी केली. गणपती मंदिर ते बहादूरशेखनाका मेनरोड सर्विस रोडवरील कामाचा अजून पत्ता नाही.
मातीच्या रस्त्यामुळे व्यावसायिकांचे व गाडी चालकांचे अतोनात नुकसान होत आहे. धुळीमुळे लोक आजारी पडत आहेत, वाहनांचे अपघात होत आहेत. या पुढे कोणताही अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच येत्या आठ दिवसांत डांबरीकरणाचे संबंधित ठेकेदाराने काम सुरू न केल्यास जनता केव्हाही कामबंद आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

Exit mobile version