कान साफ करायला गेले अन् भलतंच घडलं; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

। पनवेल । वार्ताहर ।
कान साफ करण्यासाठी गेलेल्या एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कान साफ करणार्‍या व्यक्तीने खाली पाडून त्यांच्या गळ्यातील पाऊण लाख रुपये किंतमीची सोन्याची चेन लुटून पलायन केल्याची घटना पनवेलमध्ये घडली. पनवेल शहर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

या घटनेतील तक्रारदार सुरेश प्रधान (75) हे पनवेल तालुक्यातील कोयनावळे येथे कुटुंबासह रहाण्यास आहेत. गुरुवारी ते बँकेतून पेन्शनची रक्कम काढण्यासाठी पनवेल येथे गेले होते. बँकेतून पेन्शनची रक्कम काढल्यानंतर ते पायी चालत बस स्थानकाकडे जात होते. पटवर्धन हॉस्पीटलजळ रस्त्याच्या बाजुला कान साफ करणारे दोन पुरुष व दोन महिला उभे असल्याचे निदर्शनास आल्याने प्रधान त्यांच्याकडे आपला कान साफ करण्यासाठी गेले. त्यातील एका व्यक्तीने प्रधान यांचा कान साफ करण्याच्या बहाण्याने खाली बसविले. त्यानंतर त्याने प्रधान यांना अचानक खाली पाडुन त्यांच्या गळ्यातीळ पाऊण लाख रुपये किंमतीची 2 तोळे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व लॉकेट खेचुन पलायन केले.

लुटारुसोबत झालेल्या झटापटीत प्रधान यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागील भागात गंभीर दुखापत होऊन रक्त येत असल्याने प्रधान यांनी रिक्षाने आपले घर गाठले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलासह पनवेल शहर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version