बैलगाडी शर्यतीप्रकरणी गुन्हा दाखल

। नाशिक । वृत्तसंस्था ।
सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठल्यानंतर शनिवारी नाशिकमधल्या ओझरमध्ये राज्यातली पहिली बैलगाडी शर्यत रंगली. मात्र, या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाची कसलिही परवानगी घेण्यात आली नव्हती. राज्य सरकारने राज्यात कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. त्यानुसार कुठल्याही कार्यक्रमाला 250 लोकांपेक्षा जास्त जणांचा जमाव जमवू शकत नाही. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. मात्र, या स्पर्धेला आसनक्षमतेचा तर प्रश्‍नच नव्हता. हजारो नागरिकांचा जमाव यावेळी जमला होता. राज्यभरातील शेकडो स्पर्धक उपस्थित होते. त्यामुळे येथे अलोट गर्दी होती. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत अशी निर्बंधाची आणि नियमांची पायमल्ली करत पार पडली. याप्रकरणी राज्यातला पहिला गुन्हाही माजी आमदार अनिल कदम यांच्यावर दाखल झाला. त्यांच्यासह आशिष शिंदे, स्वप्नील कदम, शिवाजी शेजवळ, हर्षल चौधरी, महेश शेजवळ, पिंटू शिंदे, अनिल सोमासे, संजय भिकुले, अमोल भालेराव या कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पुढे काय कारवाई होणार, याची उत्सुकता आहे.

Exit mobile version