ग्रामपंचायतकडून गटार मोकळ्या करण्याच्या सूचना
| नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ जवळ ममदापुर ग्रामपंचायत हद्दीमधून जाणार्या डांबरी रस्त्याला लागून चक्क तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. तर रस्त्याच्या कडेला मातीचा भराव टाकण्यात आला असून त्यामुळे राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला असलेला नैसिर्गिक पाणी वाहून नेणारे गटार बंद झाले आहे. दरम्यान, मातीचा भराव बाजूला करून जेसीबी मशीनच्या सहाय्याने गटार खोदून घेण्याची सूचना ममदापुर ग्रामपंचायत यांच्याकडून संबंधित जमीन मालकाला करण्यात आली आहे.
कर्जत-कल्याण रस्ता नेरळ ग्रामपंचायत ची हद्द सोडल्यानंतर ममदापुर ग्रामपंचायतची हद्द सुरु होते. त्या भागात रस्त्याच्या कडेला सर्व्हे नंबर 174 ची जमीन आहे. त्यातील हिंसा नंबर 4 मध्ये माती उत्खनन करण्यात येत असून गेली महिनाभर त्या ठिकाणी मातीचे उत्खनन सुरु असून महसूल विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहचले नाहीत. शासनाचा महसूल बुडत आहे, त्याबद्दल महसूल विभागाला काही काळजी नसल्याने बाबत स्थानिक लोकांनी मूग गिळून बसण्याची भूमिका घेतली होती. मात्र गेल्या महिन्यापासून स्थानिक रहिवासी अॅड.गजानन डुकरे यांनी त्या ठिकाणी सुरु असलेल्या मातीचा भराव रस्त्यावर आल्याने त्या मातीच्या उत्खनन आणि भरावाबद्दल आवाज उठविला आहे. संबंधित जागेचे सपाटीकरण करताना 25 फूट उंचीचा मातीचा डोंगर फोडण्यात आला आहे. त्याबद्दल महसूल विभागाचे अधिकारी का पोहचले नाहीत? आणि ते आजिनाही मूग गिळून बसले असल्याबद्दल स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परंतु राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे रस्त्याच्या बाजूने वर्षनुवर्षे असलेले गटार बंद झाले आहे. राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला शासनाची किमान दोन मीटर पर्यंत जमीन असते, मात्र ममदापुर येथे रस्त्याच्या बाजूला चक्क मातीचा भराव करून काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दिव्यादिप हॉटेल पासून येणारे सांडपाणी वाहून नेणारे गटार बंद झाल्याने ते सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहून जाणार आहे. टीवाले हॉटेल आणि तेथे मागे असलेल्या चार इमारत त्यांचे सांडपाणी देखील त्याच गटाराने राज्यमार्ग रस्ता ओलांडून नाल्याकडे जात असते. मात्र आता मातीचा भराव करताना रस्ताच्या जवळ भराव करताना थेट काटेरी कुंपण घालण्यात आल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. स्थानिकांनी याबाबत ममदापुर ग्रामपंचायतकडे आपल्या तक्ररी केल्या असून रस्त्याचे जुने गटार पुन्हा खोदून देण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेला गटार मातीचे भराव टाकताना बुजला आहे. तो गटार जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदून देण्याची सूचना संबंधितांना केली आहे. पावसाळा जवळ आल्याने त्यांना तात्काळ गटार खोदून देण्याचे कळविले आहे. मात्र त्यांच्याकडून गटार काढले नाही तर लेखी कळविले जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.
– संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी ममदापुर
रस्त्यावरील गटार बंद केल्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार रस्त्याची पाहणी केली जाणार आहे. स्थळ पाहणी करून कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी शाखा अभियंता स्थरावर पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– संजीव वानखेडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग