निलेश थोरे यांची मागणी
| माणगाव | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गाची स्थितीत अत्यंत दयनीय झाली असून महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात यावे अशी मागणी माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे यांनी केली आहे. यावर्षीही इंदापूर ते पळस्पे दरम्यान महामार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने या खड्ड्यांमधून पाणी साचत असल्याने बऱ्याच वेळा या खड्यांतून लहानमोठी वाहने आपटून अपघात होत आहेत. शिवाय प्रवाशांच्या शरीराची हाडे खिळखिळीत होत आहेत.
गणेशोत्सव हा कोकणातील एक मोठा सण-उत्सव असून हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतात. त्यांच्या प्रवासात कोठेही विघ्न येऊ नये यासाठी हि खड्ड्यांची समस्या उत्सवापूर्वी सुटली पाहिजे तर महामार्गावरील सर्वांचा प्रवास सुखकर होईल असेही ते म्हणाले.