खड्डे बुजवा, अन्यथा एसटी बंद

Exif_JPEG_420

मुरुड आगाराचे ग्रामपंचायतीला पत्र
| कोर्लई | वार्ताहर |

गेल्या अनेक महिन्यांपासून अलिबाग, मुरुड रस्त्यावरील बोर्ली स्थानक ते मांडला भोईघरफाटा रस्त्याची खाचखळगे व खड्ड्यांमुळे पार दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात न आल्यास एसटी गाड्या नवीन पुलावरून वळविण्यात येतील. याबाबतचे एक पत्र मुरुड आगारातर्फे संबंधित ग्रामपंचायतीला देण्यात आले असल्याचे समजते.

मुरुड आगारातर्फे देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुरुड आगाराच्या गाड्या (बसेस) मुरुड ते अलिबाग या मार्गावर धावत असताना, भोईघर फाटा-मांडला ते बोर्ली या रस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरचे खड्डे बुजवून घेण्यात यावेत. या खड्डेमय रस्त्यामुळे गाडीच्या स्प्रिंगा, टायर पंचर व बॉडी लूज होऊन एसटी प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास मुरुड आगाराच्या बसेस पर्यायी मार्गाने बोर्ली मांडला पुलावरुन जातील व मांडला गावच्या प्रवाशांची गैरसोय होईल याची दखल घ्यावी. आगार व्यवस्थापक यांनी संबंधित ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम खात्याशी संपर्क साधला असता लवकरात लवकर भोईघर -मांडला-बोर्ली रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Exit mobile version