अखेर दोन महिन्यांनी आरोपीला अटक

दादर-रावे शॉक प्रकरणाला नवे वळण

| पेण | प्रतिनिधी |

दादर गावचा तरुण संदेश पाटील हा मच्छिमारीसाठी गेलेला असताना 5 नोव्हेंबर रोजी विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या मृत्यूचे कारण विजेचा धक्का असले तरी, नक्की हलगर्जीपणा कुणाचा झाला, याविषयी स्पष्टता होत नव्हती. त्यामुळे अपघाती मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. याबाबत पोलिसांनी कसून तपासणी केली. अखेर दि.8 रोजी मयताचे नातेवाईक संतोष दिलीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करून आरोपी लक्ष्मण पाटील याला अटक केली आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, 5 नोव्हेंबर रोजी संदेश गोरख पाटील, भालचंद्र गोरख पाटील, परशुराम पद्माकर घरत, आर्यन अलंकार पाटील आणि फिर्यादी संतोष दिलीप पाटील हे दादर खाडीत रावे हद्दीमध्ये मच्छिमारीसाठी जात होते. सकाळी 9 वाजताच्या सुमारास संदेश हा सर्वांच्या पुढे चालत असताना तो अचानक जोरात ओरडण्याचा आवाज फिर्यादी व त्याच्यासोबत असणाऱ्यांच्या कानावर पडला. संदेशजवळ फिर्यादी व सर्वजण धावत गेले; परंतु त्यांच्या नजरेस विद्युत तार आली. त्यातील काही जणांना सौम्य प्रमाणात विजेचा धक्का लागला. परंतु त्यातून सावरत तार कोठून आली याचा तपास घेतल्यावर शेजारील घरातून तार आल्याचे लक्षात आले. ते घर लक्ष्मण पाटील, रा. खोकरी, रावे यांचे होते. शेवटी वीजपुरवठा बंद करण्यासाठी आवाज दिला असता, 17 वर्षीय मुलगी घराबाहेर आली आणि विद्युत प्रवाह बंद केला, असे सांगितले. त्यानंतर संदेशला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याची हालचाल बंद झाली होती. उपजिल्हा रुग्णालय पेण येथे त्याला आणले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. हेतुपूरस्सर विजेचा प्रवाह सुरू ठेवल्याने संदेशचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, यातील आरोपी लक्ष्मण पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित गोळे करत आहेत.

प्रवाहित तार कशासाठी लावली?
अपघात झालेल्या दिवसापासून हमरापूर विभागामध्ये दबक्या आवाजात बोलले जात होते की, डुक्कर मारण्यासाठी तार लावली गेली होती. परंतु, उघड कोणीही बोलायला तयार नसल्याने तार कशासाठी लावली आहे, हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्याने याबाबत ठोस पुरावे मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर डुक्कर मारण्यासाठी विद्युत तारेचा उपयोग केला असेल, तर नक्कीच डुक्कर मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही.
Exit mobile version