कोपरा – कामोठे टोलनाक्यावर अखेर फास्टटॅग सुविधा

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
शीव-पनवेल महामार्गांवरील कोपरा-कामोठे टोलनाक्यावर अखेर फास्टटॅग सुविधा सुरु करण्यात आली आहे. शनिवार (ता.19 )पासून सुरु करण्यात आलेल्या सुविधेमुळे मालवाहू वाहन चालकांना होणारी अडचण दूर होणार असून, फास्ट टॅग अभावी वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यात वारंवार होणारे वादविवाद कायमचे बंद होणार आहेत.

सुमारे 1220 कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या सायन- पनवेल महामार्गावर प्रवास करणार्‍या वाहन चालकांकडून टोल वसुली करण्यासाठी खारघर आणि कोपरा या ठिकाणी टोल नाक्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

2015 सालापासून या ठिकाणी खासगी कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून टोल वसुली करण्यात येत आहे. हलक्या आणि खासगी वाहन चालकांनांना या ठिकाणी टोल माफी देण्यात आली आहे. मात्र अवजड आणि व्यावसायिक वाहन चालकांकडून या ठिकाणी टोल वसुल करण्यात येत आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णया नुसार वाहनाना फास्टटॅग बंधन कारक करण्यात आला आहे.

नवीन वाहन खरेदी केल्या नंतर अथवा प्रादेशिक परिवहन विभागात नोंद करताना वाहणावर फास्टटॅग असणे बंधनकारक आहे. सरकारच्या या नियमानुसार वाहन चालकांनी आपल्या वाहनानवर फास्टटॅग सुविधा सुरु केली आहे. अडथळे रहित वेगवान प्रवास करता यावा या हेतूने सुरु करण्यात आलेल्या या सुविधेनुसार महामार्गांवरील टोलनाका चालकांनी देखील फास्टटॅग सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सरकारच्या या निर्णया नंतरही कोपरा-कामोठे टोल नाक्यावर ही सुविधा सुरु करण्यात आलेली नसल्याने रोख रक्कम मोजावी लागत असल्याने अनेकदा या ठिकाणी वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यात वाद विवादाचे प्रसंग घडत होते. आता मात्र शनिवारपासून सुरु करण्यात आलेल्या या सुविधेमुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version