जीव धोक्यात घालून केली केबलची दुरुस्ती
। उरण । वार्ताहर ।
घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हेखाडी ते मोराबंदर दरम्यान दि.15 जून रोजी नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदर वीजपुरवठा दोन फेज द्वारे चालू करण्यात आला होता. परंतु, थ्री फेज वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा करणारी मोटर बंद होती. समुद्राच्या आत असलेल्या केबल मधील दोष शोधण्याचे काम महिनाभरापासून सुरु होते. अधिकारी व कार्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व परिस्थितीवर मात करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घारापुरीचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. या कामाबाबत संचालक संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत होता.
घारापुरी येथील दोन नादुरुस्त सिंगल कोर समुद्राखालील केबलमधील दोष न्हावाखाडी ते मोरा बंदर दरम्यान समुद्राचा आत असल्याने तसेच वादळ वाऱ्याबरोबर प्रचंड मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती ओहोटी व त्यामुळे उदभवणारी अपरिहार्य परीस्थितीवर मात करत सदरचे काम प्रगती पथावर चालू होते. नादुरुस्त सिंगल कोर केबलमधला दोष शोधण्यासाठी महावितरणच्या पनवेल शहर विभागातील कर्मचारी मागील एक महिन्यापासून युध्दपातळीवर प्रयत्न करत होते. सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंत सुनिल काकडे यांनी लक्ष देऊन कामाला गती देण्यासाठी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांना विशेष सूचना दिल्या.
महिना भरापासून संततधार पावसात अविरत काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे, बेटावरील तिन्ही गावांचा पाणी पुरवठाची समस्या सोडवण्यात आली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समुद्राखालचे दोष शोधून काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल बेटावरील तिन्ही गावचे ग्रामस्थांनी महावितरणचे आभार मानले आहे. या कामासाठी, पनवेल शहरचे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, देविदास बैकर, रणजीत देशमुख व विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन या कठीण कामाला यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.