रायगडमधील जंगल भागातील पाणवठे झाले स्वच्छ
| अलिबाग | प्रतिनिधी |
पाणीटंचाईत केवळ माणसेच होरपळतात असे नव्हे, तर पक्षी-प्राण्यांनाही त्याचा फटका बसतो. पाण्याच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीत येतात आणि कोणाची तरी शिकार बनतात. त्यामुळे प्राण्यांना जंगलातच मुबलक पाणी मिळावे यासाठी वन विभागामार्फत पुढाकार घेत जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधण्यात आले. हे स्त्रोत स्वच्छ करून जंगली प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.
वाढत्या उन्हाच्या कडक्यामुळे जंगलातील पशु, पक्षांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. जंगलभागातील पाणवठे स्वच्छ करून पशु-पक्ष्यांसाठी पाण्याचा स्त्रोत खुला करण्याचे आदेश वनक्षेत्रपाल यांना देण्यात आला. जिल्ह्यात तातडीने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. अलिबासह सुधागड व अन्य तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाण्याचे स्त्रोत शोधले. ते स्वच्छ करून जंगलातील प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. राहुल पाटील यांच्या संकल्पनेचे जिल्ह्यातून सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून, प्राणीप्रेमींनीदेखील या उपक्रमाला पाठिंबा देत पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जंगलभागातील पशु, पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटल्याचे दिसून येत आहे.
जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगलातील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत शोधून ते स्वच्छ करण्यात आले असून, यातून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनीदेखील चांगले सहकार्य केले आहे.
राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग