अखेर मुलीचा मृतदेह घेतला ताब्यात

पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु

। अलिबाग । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेला पोलीस हवालदार गेल्या 24 तासानंतरही मोकाटच आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधीत हवालदारावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अखेर बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर ताब्यात घेतला.

25 वर्षीय तरुणीची प्रकृती बरी नसल्याने पोलीस कर्मचार्‍याने दोन दिवसांपूर्वी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले होते. त्यानंतर तो तेथून पसार झाला होता. तिची प्रकृती खालावल्याने मंगळवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस पोलीस हवालदार जबाबदार असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी विनंती तरुणीच्या वडीलांनी पोलिसांकडे करत होते. परंतु चौकशी झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे पोलीसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची धारणा मृत तरुणीच्या नातेवाईकांची झाली होती. त्यामुळे गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका मुलीच्या वडिसांसह नातेवाईकांनी घेतली होती.

नातेवाईकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पोलीसांची तारांबळ उडाली. अखेर मृत तरुणीच्या वडिलांसह नातेवाईकांनी दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक घार्गे भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु घार्गे हे त्यांच्या कामात व्यस्त असल्याने दुपारी अडीज वाजता भेट झाली. त्यानंतर त्यांनी संबंधीतावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा विश्‍वास मृत तरुणीच्या वडिलांना दिला.

दरम्यान, मृत तरुणीच्या आई-वडीलांचा जबाब घेऊन पुढील प्रक्रीया सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तरुणीच्या अंगावर जखमा
तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिच्या अंगावर जखमा होत्या. केस तुटलेले होते. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तिला उपचारासाठी दाखल केले होते. ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर मंगळवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस कर्मचार्‍याबाबत असलेल्या आरोपाची पडताळणी केली जात आहे. पडताळणीनंतर पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

आरोपी हवालदारा विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. अद्याप त्याला अटक केलेली नाही. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

संदीप पोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नागोठणे पोलीस ठाणे
Exit mobile version