अखेर पाली स्मशानभूमीवर पत्रे बसविले

नगरपंचायत व नगरसेवकांचा पुढाकार
| सुधागड -पाली । वार्ताहर ।
पाली बस स्थानकाजवळील अंबा नदी किनारी असलेल्या प्रमुख स्मशानभूमीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शिवाय स्मशानभूमीचे पत्रे फुटल्याने येथे भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत होते. तीन दिवसांपूर्वी माध्यमांनी ही बाब निदर्शनास आणली होती. त्या अनुषंगाने दखल घेत पाली नगरपंचायत व बांधकाम सभापती प्रणाली शेळके, पाणी पुरवठा सभापती सुलतान बेनसेकर उपनगराध्यक्ष आरिफ मणियार आदींच्या पुढाकाराने स्मशानभूमीवर पत्रे बसविण्यात आले आहेत.

सोमवार (ता.4 जुलै) येथे एक मृतदेह जाळण्यासाठी तब्बल साडेसहा तास लागले होते. तसेच 45 लिटर रॉकेल व 40 टायरचा वापर करावा लागला. या असुविधेमुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. स्मशानभूमीवर पत्रे बसविले असले तरी देखील अजुनही स्मशानभूमीला अनेक समस्यांनी घेरले आहे. या स्मशानभूमीत विजेची व्यवस्था नाही. लाद्यांचे व सिमेंटचे बाकडे तुटले आहेत. तर काही समाजकंटकांनी ते तोडले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी जागा नाही. फारश्या तुटलेल्या आहेत. स्मशानभूमीच्या एका बाजूची जमीन खचली आहे. त्यामुळे स्मशानभूमी नदीत ढासळण्याचा धोका आहे. यामुळे अपघात देखील घडू शकतो. स्वच्छता व इतर कामांसाठी कायमस्वरूपी माणसाची नेमणूक नाही. त्यामुळे नेहमी अस्वच्छता असते. ही स्मशानभूमी दारुड्यांचा अड्डा झाला आहे. शिवाय पालीतील एकमेव लाकडांची वखार बंद झाल्याने मृतदेह जाळण्यासाठी नागोठणे येथे जावे लागते. यासाठी अधिकचा वेळ व पैसा जातो. एकूणच स्मशानभूमीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या सगळ्याचा याचा हकनाक त्रास मृतांचे नातेवाईक व लोकांना होत आहे.

नगरपंचायतने लागलीच दखल घेऊन स्मशानभूमीवर पत्रे बसविले त्याबद्दल या नगरसेवकांचे आभार. मात्र येथील इतरही बाबींची योग्य देखभाल व दुरुस्ती करायला हवी.

– भास्कर दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते, पाली,


Exit mobile version