अखेर आरसीएफ प्रशासन नरमले

शाळेचे नवीन प्रवेश सुरू करण्याचे आदेश

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली आरसीएफ शाळा बंद होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, विद्यार्थी व पालकांची आक्रमक भूमिका आणि जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशामुळे आरसीएफ प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, नवीन शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरसीएफ शाळेच्या संदर्भात मागील महिन्यापासून चालू असलेल्या आरसीएफ थळ प्रशासनाच्या मनमानी कारभाराची सत्यता आज समोर आली असून, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट सांगितले आहे की, नवीन प्रवेश व वर्ग बंद करण्याचा सर्वस्वी निर्णय हा आरसीएफ थळ प्रशासनाचा होता आणि असा कोणताही निर्णय आमच्या सोसायटीने घेतलेला नाही. मागील दहा-बारा दिवसांपासून चालू असलेल्या चौकशी पडताळणीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बास्टेवाड यांनी आरसीएफ शाळेची सन 2024-25 ची प्रवेश प्रक्रिया डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयाने पूर्ववत सुरू करण्याबाबत आरसीएफ थळ प्रशासनाला कळविले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, सर्व पालक, शिक्षक, पत्रकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल धनंजय म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version