। माथेरान । वार्ताहर ।
महात्मा गांधी मार्गावर बसविलेले क्ले-पेव्हर ब्लॉक वरून उताराच्या ठिकाणी घोडे घसरण्याचे प्रकार घडू लागल्याने स्थानिक अश्वपाल आणि मूळवासीय अश्वपाल संघटना यांनी एकत्रित हे ब्लॉक हटविण्यासाठी घोडेबंद आंदोलन सुरू केले होते अखेर प्रशासनाला नमते घेऊन हे ब्लॉक काढण्याचे काम सुरू झाले आहे.
गेली दोन दिवस माथेरान मध्ये घोडे बंद आंदोलन सुरू होते.त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात घोडे बंद असल्यामुळे पर्यटकाना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते.घोडे बंद असल्यामुळे पर्यटकांना ट्रेनचे तिकीट मिळाले नाही तर अमन लॉज ते बाजार पेठ हे दोन किलोमीटर अंतर भर उन्हात पायी चालत यावे लागत होते.
घोड्यांचे शहर म्हणून पर्यटक संबोधतात ते माथेरान पर्यटनस्थळ हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन आहे. इथे आल्यानंतर घोड्यावर रपेट मारणे हा पर्यटनाचा प्रमुख छंद.पण गेली दोन दिवसांपासून येथील घोडे बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होऊन घोड्यावर रपेट मारण्याचे स्वप्न भंगले आहे. घोडा ही माथेरानची शान असून घोड्यावर बसून फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथील परवाना असलेले 460 घोडे आहेत. या घोड्यांना चालण्यासाठी असलेल्या लालमातीच्या रस्त्यावर क्ले-पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. त्यातील चढउतारावरील क्ले-पेव्हर ब्लॉकवरून घोडे घसरतात. अनेक वेळा तक्रारी करून देखील यावर कारवाई झाली नसल्याने त्यांनी घोडा बंद आंदोलन पुकारले होते.
अखेर एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी आदेश देताच ठेकेदारांच्या कर्मचार्यांमार्फत हे क्ले-पेव्हर ब्लॉक हटविण्याचे काम सुरू झाले आहे.स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा तसेच समस्त अश्वचालक यांच्या समोर ब्लॉक हटविण्याचे काम सूरु झाले आहे.अंदाजे 200 मीटर अंतरावरील ब्लॉक काढले जाणार आहेत.दोन दिवसांच्या विश्रांती नंतर घोडा तबेल्यातून बाहेर पर्यटकाच्या सेवेशी रस्त्यावर आला आहे.आमच्या विनंतीला मान देऊन क्ले-पेव्हर ब्लॉक काढल्याबद्दल आम्ही आमचे आंदोलन मागे घेत आहोत असे अश्वचालकांकडून सांगण्यात आले.
प्रशासनाने आमची बाजू ऐकून रस्त्यावरील क्ले-पेव्हर ब्लॉक हटविण्याचे काम सुरू केले त्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद अर्धा रस्ता क्ले-पेव्हरचा राहणार असून अर्धा रस्ता मातीचा असणार आहे.
-गणेश घावरे,
उपाध्यक्ष, स्थानिक अश्वपाल संघटना