अखेर प्रांत राहुल मुंडकेंची बदली

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलचे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांची दलालांमार्फत पिळवणूक होत असल्याचा गंभीर प्रश्‍न विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याचबरोबर उरण सामाजिक संस्थेने राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे राहुल मुंडके यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली असून, दि.22 ऑगस्ट रोजी प्रांत राहुल मुंडके यांची बदलीचे आदेश काढले आहेत.

प्रांत राहुल मुंडके यांच्याविरोधात उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष कॉ. भूषण पाटील, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांनी प्रशासनास निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये आमालडुंगे, ता. पनवेल येथील आदिवासी कुटुंबाच्या नावे अनेक वर्षे 7/12 सदरी सुमारे अडीच एकर जमीन होती. मुंडके यांच्या कार्यकाळात अचानक आधीच्या सावकाराने कुळाची नावे चुकीची लागली असून, 7/12 सदरी त्यांच्या नावाची नोंद करण्याचा अर्ज दाखल केला. प्रांत मुंडके यांनी काहीही चौकशी न करता, हेतुपुरस्सरपणे सदरहू अर्ज जमीन न्याय प्राधिकरणाकडे पाठवला. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आदिवासी कुटुंबाची जमीन सावकाराच्या नावे झाली आहे. नेरे, ता. पनवेल येथील दोन एकर जमीन विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी गेलेली आहे. प्रांत मुंडके यांच्या कार्यकाळात सदरहू जमीन गैरमार्गाने आणि चुकीच्या पद्धतीने काही वारसांची नावे वगळून जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी चुकीच्या वारसाच्या नावे झालेली आहे. संबंधित वारसांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले होते. पुनाडे, ता. उरण येथील आदिवासी कुटुंबाच्या नावे असलेली एक एकर जमीन गैरमार्गाने दुसर्‍या व्यक्तीच्या नावे झालेली आहे. मूळ शेतकर्‍यांनी प्रांत मुंडके यांच्याकडे त्याबाबत तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी प्रांत मुंडके यांना प्रत्यक्ष आदेश देऊनही आजपर्यंत त्यांनी चुकीची दुरूस्ती केलेली नाही. दिघोडे, ता. उरण येथील आदिवासी कुटुंबाच्या नावे असलेली सुमारे पाच एकर जमीन गैरमार्गाने 1983 साली बिगर आदिवासी कुटुंबाच्या नावे झाली होती. ही बाब लक्षात येताच एका वारस आदिवासी महिलेने प्रांत मुंडके यांच्या कार्यकाळात आमरण उपोषण केले होते. परंतु, मुंडके यांनी सदरहू आदिवासी महिलेला चुकीचा सल्ला देऊन प्रकरण न्याय प्रविष्ट करून घेतले.

चाणजे, म्हातवली आणि बोरीपाखाडी, ता. उरण येथील भिवंडीवाला ट्रस्टच्या नावे असलेली शेकडो एकर जमीन तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांनी गैरमार्गाने एका व्यक्तीच्या नावे केली. त्यामुळे सदरहू जमिनीची विक्री होऊन उरण येथील 100 वर्षे जुनी भिवंडीवाला गार्डन नष्ट झाली आहे आणि चाणजे आणि म्हातवली येथील जमिनीचे अनधिकृत उत्खनन होऊन ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वत धोक्यात आला आहे. याप्रकरणी प्रांत मुंडके यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना हेतुपुरस्सर संदिग्ध अहवाल सादर केलेला आहे, असे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत प्रांत राहुल मुंडके यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version