अखेर कोलाड रोहा रस्त्यावर पथदिव्यांचे काम जोरदार सुरु

गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावर लखलखाट होणार

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 ला जोडणारा कोलाड-रोहा राष्ट्रीय मार्ग या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मार्किंग केली आहे. परंतु अद्याप ही या मार्किंगला नाही पोल बसविले की नाही पथदिवे लागले. यामुळे या मार्गावर अंधार असल्यामुळे चोरीचे प्रकार तसेच अपघाताचे प्रमाण वाढले असल्याची बातमी दै. कृषिवलमधून प्रकाशित झाल्यानंतर 15 दिवसात दखल घेऊन पथदिवे बसविण्याचे काम जलद गतीने सुरु केले असुन दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत.

कोलाड रोहा मार्गावर धाटाव औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. सेकंड शिफ्टवरुन सुटणारे कामगार तसेच रात्रपाळीला जाणारे कामगारांची दुचाकीवरून येणार्‍यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या मार्गाच्या बाजूला काही ठिकाणी मोठी झाडे आहेत. शिवाय या मार्गाच्या रस्त्याचे काम अतिशय उत्तम प्रकारचे झाले आहे. यामुळे या मार्गावर सुसाट जाणार्‍या वाहनांमुळे अपघात होऊ नये म्हणून रस्त्याला जागोजागी गतिरोधक बसविले आहेत. परंतु या रस्त्यावर अंधार असल्यामुळे येणारी जाणारी वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा या मार्गावर अपघात होत आहे.

कोलाड रोहा मार्गावर पथदिवे नसल्यामुळे दररोज चोरीचे प्रकार वाढले असून या मार्गावरून एक महिन्यांपूर्वी मिथुन जैन यांची 13 हजार रुपयांची सायकल तर पाच दिवसापूर्वी आंबेवाडी येथील रामदास लोखंडे यांच्या पान टपरीतुन रोख रक्कम व माल चोरीला गेला तसेच पालेखुर्द येथील टपरी फोडून माल चोरीला गेला. याला मुख्य कारण या मार्गांवर पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरी होत असून गणेश उत्सवाच्या अगोदर या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात होती. याबाबतची बातमी दैनिक कृषिवल मधून प्रकाशित झाली होती. याचा परिणाम सत्यात उतरून एक ते दोन दिवसात या मार्गावर पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण होईल. यामुळे हा मार्ग प्रकाशमय होईल व जनतेच्या अनेक अडचणी दूर होतील.

Exit mobile version