अखेर 35 व्या स्मरणपत्राने मिळाला न्याय

रायगड जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा केला सुरळीत

| आविष्कार देसाई | रायगड |

अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर परिसरातील नागरिकांना पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने पाण्याची पाईपलाईनच काढून नेल्याने येथील पाच कुटुंबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. याविरोधात येथील ग्रामस्थ राजन भगत यांनी प्रशासनाला एक हजार स्मरणपत्र पाठवण्याचा संकल्प केला होता. पाणी देत नाही तोपर्यंत स्मरणपत्र आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे मनसुबे त्यांनी स्पष्ट केले होते. भगत यांच्या 35 व्या स्मरणपत्राची दखल घेत रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने आता पाण्याची पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत सुरु केला आहे.

प्रशासकीय यंत्रणेबरोबर गेले तीन वर्षे एकाकी झुंज देणारे राजन भगत एका अनोख्या आंदोलनामुळे पुन्हा चर्चेत आले होते. पाणी पिळावे यासाठी सरकारसह रायगड जिल्हा परिषद प्रशासनाला एक हजार स्मरणपत्रे पाठवणार होते. त्यांनी आतापर्यंत इमेलद्वारे 35 स्मरणपत्रे सरकार आणि प्रशासनाला पाठवली असून, त्यांची दखल आता जिल्हा परिषदेने घेतली आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड हे गाव 2006 साली रिलायन्स आणि टाटाच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पामुळे प्रकाशझोतात आले होते. पुढे परिसरातील नागरिकांनी कायदेशीर विरोध करत दोन्ही कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याच शहापूर-धेरंड परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली. येथील लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. गावात पाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. राजन भगत यांनी तर प्रशासकीय यंत्रणेसोबत ढीगभर पत्रव्यवहार, अर्ज, विनंत्या केल्या आहेत. पाणी मिळणार एवढेच आश्वासन त्यांना मिळत आले होते. आश्वासनाचे चौथे वर्ष असताना त्यांना अखेर न्या मिळाला आहे.

रविवारी जिल्हा परिषद प्रशानाने राजन यांच्या परिसरात पाईपलाईन जोडून पाणी सुरु केले आहे. त्यामुळे पाच कुटुंबांचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. गावात पाणी देण्यासाठी जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण गरजेचे आहे, असे राजन भगत यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

Exit mobile version