इंधन दरवाढीवरुन अर्थमंत्री चिंताक्रांत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात सातत्याने वाढणार्‍या इंधनाच्या किंमतींवर चिंता व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने देशात इंधनाचे दर वाढत आहेत, नवनवे उच्चांक गाठत आहेत, त्याचं मोठं आव्हान माझ्यासमोर आहे. अर्थ विभागातील आमची टीम देखील याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेऊन आहे, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. ही अनिश्‍चितता माझ्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे, असं देखील त्यांनी नमूद केलं.
कोरोना काळामध्ये देशाला बसलेल्या आर्थिक फटक्यामधून सावरण्याचा प्रयत्न भारतीय अर्थव्यवस्था करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. मात्र, त्यासोबतच, सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हानं देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. यात प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे, विशेषत: इंधनाचे वाढणारे भाव हे एक मोठं आव्हान आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होऊन केंद्र सरकारच्या खर्चावर मर्यादा पडण्यात होत असल्याचं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Exit mobile version