चामरे कुटुंबियांना आर्थिक मदत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पाकिस्तान-ओखा(गुजरात) सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात निधण पावलेल्या श्रीधर रमेश चामरे या मच्छिमार कुटुंबाला कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजप विधानपरिषदेचे आ. रमेश पाटील यांच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. हा धनादेश भाजपा मच्छिमार सेलचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील यांनी चामरे कुटुंबास सुपूर्त केला.
भारताशेजारील पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे भारतासह शेजारधर्म पाळण्यास तयार नाहीत. या राष्ट्रांकडून नेहमीच काहीना काही कुरघड्या करण्यात येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानी सैन्याकडून देण्यात नुकताच देण्यात आला आहे. पाकिस्तानी सैन्याकडून पाकिस्तान-ओखा(गुजरात) या सागरी सीमा रेषेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जलपरी पालघर जिल्ह्यातील तरुण मच्छिमार श्रीधर रमेश चामरे या बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला मानसिक तथा आर्थिक स्वरूपाचा आधार देण्याच्या उद्देशाने कोळी महासंघ भाजप यांच्यातर्फे मदत देण्यात आली आहे.
याप्रसंगी अ‍ॅड. चेतन पाटील यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत, राज्याचे मुख्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री यांना मृत मच्छीमार बांधवांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने तात्काळ मदत देण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. तसेच शासन लवकरात लवकर योग्य ती मदत करेल अशी आशा व्यक्त केली. याशिवाय, गुजरात राज्यशासन तसेच केंद्र शासन यांच्याकडून चामरे कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टिने मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही पाटील यांनी प्रतिपादीत केले.
यावेळी अशोक हंबीरे, विजय तामोरे, प्रमोद आरेकर, भुषण पाटील, सुजित पाटील, समीर पाटील, सचिन पागधरे, धनंजय मेहेर, तन्मय साखरे, पंकज मेहेर, नंदिनी चामरे आदी मान्यवर व भाजपा मच्छीमार सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version