आदिवासी मखर कलावंतावर कोरोनामुळे आर्थिक संकट

। नेरळ । वार्ताहर ।
आदिवासी भागातील कलाकार हे गणेश उत्सवासाठी बांबूच्या पातींपासून मखर बनवतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे मखर कलावंत रोजगार शोधत असून कोरोनाने त्यांचा रोजगार हिरवला आहे. दरम्यान, कुटुंब चालविण्याएवढे देखील पैसे त्यांना या व्यवसायात मिळत नाहीत. नागेवाडी ही आदिवासीवाडी कशेळे गावापासून आठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. थोराड कुटुंब मखर बनवून घर चालविण्याचा प्रयत्न करतात, मात्र गेली दोन वर्षे शासनाचे प्रदर्शन देखील भरले नाही आणि त्यामुळे ही कुटुंबे आणखी आर्थिक विवंचनेत सापडली आहेत. गणेशोत्सव आधी तीन महिने हे बांबू कारागीर बांबूच्या पातींपासून मखर घडवतात.त्यातील बांगलादेश मधून प्रशिक्षण पूर्ण करून आलेले नागेवाडी येथील मोरू शिरू थोराड हे 40 च्या आसपास मखर बनवायचे. मात्र मागील दोन वर्षांपासून त्यांना कशेळे येथील बाजारात भाड्याने जागा घेऊन मखर बनवायला देखील परवडत नाही. त्यात आता बांबूच्या मेस जातीचे बांबू हे देखील विकत आणावे लागतात आणि त्यामुळे जेमतेम 3-4 मखर एवढीच ऑर्डर त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मोरू थोराड आणि त्यांचा मुलगा भरत हे दोघे परंपरागत व्यवसाय म्हणून टिकून आहेत. वाडीतील अन्य कारागिरांनी व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने सोडून दिले आहेत. त्यात मखरचे काम अत्यंत नाजूक असल्याने त्यात आपली कारागिरी दाखवून चार मखर बनवण्याचे काम कोरोना काळात आपल्या घरीच करीत आहेत.

Exit mobile version