मच्छिमारांवर आर्थिक संकट

| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

वातावरणातील बदलांचा परिणाम मासे मिळण्यावर होत असून गिलनेटने मासे पकडणाऱ्या छोट्या व्यावसायिकाची स्थिती गंभीर आहे. यावर अवलंबून असणाऱ्या हजारो मच्छिमार कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदा पावसाळ्यानंतरच्या तीन महिन्यात ही उलाढाल कमी झाली आहे. त्यामुळे मच्छिमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारीपाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरु झाली.

मासे मिळण्याचे प्रमाण घटले आहे. वातावरणातील बदलांमुळे मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरुन ठेवण्यात येतात. वातावरण निवळले की मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊनही अत्यल्प मासे मिळतात. त्यामुळे त्या फेरीचे गणित विस्कटते. वातावरणातील बदलांमुळेच मत्स्यसाठ्यांवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून काहींनी अत्याधुनिक यंत्राच्या वापरामुळे किनारी भागात मासे कमी प्रमाणात मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मासे कमी मिळाले की खलाशांचा खर्चही भागत नाही. मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे निर्यातीवरही परिणाम होत आहे.

डिझेलचा खर्च, बर्फ, खलाशांचा पगार व भत्ता, जाळी व इंजिन दुरुस्ती आदीवर दररोज होणारा भागवण्याचे आव्हान मच्छिमारापूढे आहे. बँकेचे कर्ज तसेच व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या आगाऊ रकमेची परतफेड यासारख्या आवाहनांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सुरवातीला बांगडा मासा काहीप्रमाणात मिळत होता. त्याला किलोला 80 ते 110 रुपये दर मिळाला. त्यामुळे मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. परंतू बांगड्याचे प्रमाणही घटल्यामुळे मच्छिमारांची चिंता वाढली आहे. गेले चार दिवस ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे किनारी भागात वारेही वाहत आहेत. त्यामुळे मासळी खोल समुद्रात जाते. परिणामी पुढील काही दिवस पुन्हा मासे मिळणे अशक्य असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Exit mobile version