। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल, खांब येथे एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड व श्रीविवेकानंद रिचर्स आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रोहा तसेच महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने खांब परिसरातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्दिष्टाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महिला सक्षमीकरणासाठी महिलाचे आर्थिक स्वावलंबन करणे आवश्यक आहे. याच विचारातून ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्याध्यापिका रिया लोखंडे यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यास आंबेवाडी मतदारसंघ रोहा पंचायत समितीच्या सदस्या सिद्धी राजीवले यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या.
दोन दिवसांच्या या शिबीर कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य महिलांनी सहभाग नोंदविला असून, महिला प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन, त्यास उपलब्ध असणारे मार्केट आणि त्यासाठी आवश्यक असणारी भूमिका याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
शिबिराअंती रोहा तालुका मुख्य कृषीधिकारी महादेव करे यांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षित महिलांना महाराष्ट्र शासन मान्य प्रशस्ती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.