| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीमधील डायमंड हेरिटेजमध्ये स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने मुंब्रा कौसा येथील अन्वरअली इंद्रिससहोबोले नावाच्या एका बिल्डरने सहा जणांची 58 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
खारघरसारख्या स्मार्ट सिटीचे मध्यमवर्गीयांना आकर्षण आहेच. शिवाय मुंबई, उपनगरे आणि नवी मुंबईतील औद्योगिक वसाहती, खासगी कार्यालयात नोकरीला जाण्यासाठी रेल्वे आणि इतर सार्वजनिक प्रवासी दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसंही शहरांच्या आजूबाजूच्या होणार्या नागरिकरणात घर घेण्यासाठी गुंतवणूक करीत आहेत. त्यातून अलीकडे अनेकांची फसवणूक होताना दिसत आहे. याशिवाय अनेक बिल्डर, दलालांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही जण जेलवारी करीत आहेत. तरीसुद्धा आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात घट होताना दिसत नाही.
मुंब्रा येथे राहणार्या अन्वरअली इंद्रिससहीबोले नावाच्या बिल्डराने विश्वनाथ माने (12 लाख), पांडुरंग जाधव (1 लाख 25 हजार), उत्तम चव्हाण (12 लाख), उज्वला चव्हाण (13 लाख 75 हजार), जितेंद्र जगदाळे (4 लाख 50 हजार), कुका पादव (5 लाख 50 हजार) असे सहा जणांकडून 58 लाख रुपये उकळून त्यांना बोगस खरेदीखत करून दिले आहे. फसवणूक झाल्याने विश्वनाथ माने यांनी खारघर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजित ठाकूर यांनी गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौषका सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद फडतरे पुढील तपास करीत आहेत.