सहाय्यक निबंधकासह, दुग्ध संकलन पर्यवेक्षकाविरोधात लेखी तक्रार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील सहकारी संस्थेतील (दुग्ध) सहाय्यक निबंधकांसह दुध संकलन पर्यवेक्षकांनी वसुलीचा धमाका सुरु केला आहे. संस्था बंद करण्याची धमकी देत मच्छिमार संस्थाकडून आर्थिक लुट करीत असल्याचा आरोप होत आहे. मुरूडसह अलिबाग तालुक्यातील दहा मच्छिमार सोसायटीकडून लाखो रुपयांसह डिझेल व मासळीची वसूली करण्याचा गोरखधंदा सहाय्यक निबंधक भंडारे आणि दुध संकलन पर्यवेक्षक कमलेश धुत्रे यांनी सुरु केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजपूरी येथील महालक्ष्मी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विजय गिदी यांनी केली आहे.
जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, अशा अनेक तालुक्यांमध्ये 50 हून अधिक मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहेत. या संस्थाचा कारभार (दुग्ध) सहकारी संस्था अलिबागमार्फत चालविला जातो. सहाय्यक निबंधक यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार सोसायटीचा कारभार पाहिला जातो. परंतु, मच्छिमार सोसायटींकडून सहकारी संस्थामधील सहाय्यक निबंधकांसह दुध संकलन पर्यवेक्षक आर्थिक वसुली करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
भंडारे हे गेल्या दोन महिन्यांपासून सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत दुध संकलन पर्यवेक्षक म्हणून कमलेश धुत्रे काम पहात आहे. या दोघांनी गेल्या काही दिवसांपासून मच्छिमार सोसायटीकडून वसुली सुरु केली आहे. मच्छिमार संस्थेचे सेक्रेटरी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून पैशाची मागणी करून लाखो रुपयांची वसुलीचे सत्र या दोघांनी सुरु केल्याचा आरोप विजय गिदी यांनी केला आहे.
25 हजार, 30 हजार 15 हजार या प्रमाणे रक्कम मागवून कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले जात आहे. पैसे न दिल्यास तुमची संस्था बंद करण्यात येईल. संस्थेवर प्रशासक नेमला जाईल, अशी धमकी देऊन भिती निर्माण करीत आहेत. संस्था चालकांना दमदाटी देऊन पैशांची वसुली होत असताना डिझेलदेखील फुकट घेतला जात आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील सात आणि अलिबाग तालुक्यातील तीन अशा एकूण दहा मच्छिमार सोसायटीकडून आर्थिक लुट करण्यात आली आहे. या घटनेनंतर जिल्हयातील अन्य मच्छिमार सोसायटीकडूनदेखील वसूली केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अखेर महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांच्याकडे दोघांविरोधात लेखी तक्रार केली आहे. याबाबत सहाय्यक निबंधक भंडारे यांच्याशी संपर्क साधला, असता होऊ शकला नाही.
या संस्थाकडून केली वसूली
मुरूडमधील राजपूरी येथील श्री महालक्ष्मी मच्छिमार सोसायटीकडून 16 हजार रुपये आणि एक हजार रुपयांची मासळी, मुरूडमधील जय भवानी मच्छिमार सोसायटीकडून दहा हजार रुपये व वीस लिटर डिझेल, माहेश्वरी मच्छिमार सोसायटीकडून तीन हजार रुपये, एकदरा येथील हनुमान मच्छिमार सोसायटीकडून 15 हजार रुपये, एक हजार रुपयांची मासळी, एक हजार रुपयांचे जेवण व वीस लिटर डिझेल, सागरकन्या मच्छिमार सोसायटीकडून पाच हजार रुपये, विजयसागरकडून 15 हजार रुपये शिवस्मृती मच्छिमार सोसायटीकडून एक हजार रुपये. अलिबागमधील रेवदंड्यातील दर्यातरणकडून सात हजार रुपये व दहा लिटर डिझेल. साखर मच्छिमार सोसायटीकडून 23 हजार रुपये आणि साखर मच्छिमार सोसायटीकडून 25 हजार रुपये व दहा लिटर डिझेल वसूल केल्याचा आरोप आहे.
जिल्हा उपनिबंधकांचे मत्स्य आयुक्तांना पत्र
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) अलिबाग व दुग्ध विभागातील कर्मचारी असे दोघेजण सहकारी संस्थाकडून वसूली करीत आहेत, अशा आशयाची तक्रार जिल्हाउपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. अर्जदार संस्थेने केलेले मुद्दे यांचा विचार करता, ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे दिसून येत आहे. तरी या संदर्भात संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी कार्यालयाची धारणा आहे, असे पत्र जिल्हा उपनिबंधक यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त यांना पाठविले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुरूड व अलिबाग तालुक्यातील मच्छिमार सोसाटीकडून कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली नाही डिझेलही घेतले नाही.याबाबत माझा काहीही संबंध नाही.
कमलेश धुत्रे
दुध संकलन पर्यवेक्षक
सहकारी संस्था (दुग्ध) अलिबाग
गेल्या दोन महिन्यांपासून भंडारे हे सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सहकारी कमलेश धुत्रे आहे. हे दोघेजण वेगवेगळ्या मच्छिमार सोसायटीतील चेअरमन सेक्रेटरी यांच्याशीसंपर्क साधून पैशाची मागणी करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी दीड लाख हून अधिक रुपयांची आर्थिक लुट केली आहे. संस्था बंद करण्याची धमकी देऊन मच्छिमार सोसायटीमधील चालकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना निंदनीय आहे. त्यामुळे या दोघांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
विजय गिदी
माजी अध्यक्ष
महाराष्ट्र मच्छिमार संघ मुंबई
तपासणीच्या नावाखाली कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी देण्यात आली. तुमचा कारभार बेकायदेशीर कसा चालतो हे माहित आहे. तुमच्या संस्थाच बंद करून टाकतो असे सांगून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 23 हजार रुपये घेतले आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून हे अधिकारी व कर्मचारी लुट करीत आहेत.त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संस्था सक्षम नसतानाही त्यांच्याकडून वीस हजार रुपये घेतले आहेत.
चेअरमन
(नाव न सांगण्याच्या अटीवरून )







