श्रीवर्धन पर्यटकांविना सुना सुना

स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान
शासनाकडून अद्याप कोणतीही मदत नाही
श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यात प्रामुख्याने पर्यटन व मच्छिमारी हे व्यवसाय चांगल्या प्रमाणात चालतात. मात्र, कोरोनामुळे पर्यटन व्यावसायिकांचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या भीतीने पर्यटनासाठी लोक घराबाहेर पडत नाही. याचा मोठा फटका श्रीवर्धनलासुद्धा बसला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील वर्षी, म्हणजेच 2020 साली जवळजवळ आठ ते नऊ महिने व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. तर, यावर्षीदेखील पाच महिने व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. शासनाने निर्बंध हटवल्यानंतर पर्यटन व्यावसायिकांनी आपापल्या हॉटेलची दुरुस्तीची कामे करून घेऊन, हॉटेल व्यवसाय चालू करण्यासाठी सर्व प्रकारची लागणारी साधन सामग्री त्याचप्रमाणे नोकरवर्ग यांना तयार करून ठेवले. परंतु, एक ऑगस्टपासून अजूनपर्यंत एकाही शनिवारी, रविवारी सुद्धा पर्यटक या ठिकाणी आलेले नाहीत. पावसाळ्यात एक जून ते 31 जुलै या काळामध्ये मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्यामुळे हा व्यवसायदेखील बंद असल्यामुळे या व्यवसायावर निगडित असणार्‍या व्यावसायिकांचेदेखील मोठ्या प्रमाणावरती हाल होत आहेत.
निसर्ग चक्रीवादळानंतर बहुतांश पर्यटन व्यावसायिकांच्या इमारतींचे बरेच नुकसान झाले होते. परंतु, शासनाकडून अशाप्रकारे पर्यटन व्यवसाय करणार्‍यांना कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही. अनेक पर्यटन व्यावसायिकांनी व्यवसाय करण्यासाठी बँकांकडून कर्ज देखील घेतली आहेत. मात्र, ही कर्ज भरायची कशी असा यक्षप्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सण साजरे करण्यासाठी देखील आता लोकांकडे पैसे नसल्याचे बोलले जात आहे. पर्यटक येत नसल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, दिवेआगर हे समुद्रकिनारे ओस पडल्याचे पाहायला मिळत आहे. तरी श्रीवर्धनच्या आमदार व रायगडच्या पालकमंत्री तसेच राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पर्यटन व्यवसायवाढीसाठी श्रीवर्धन वासीयांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version