। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील खारघर येथील ओवे डोंगरावर मोठ्या प्रमाणात वणवा पेटला. या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा खाक झाली असून, वन्यप्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. डोंगरावर पर्यटकांच्या नावाखाली येणार्या मद्यपींकडून वणवा पेटविला जात असल्यामुळे वनविभाग कर्मचारी हतबल झाले आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात खारघर सेक्टर- 34 लगत असलेल्या डोंगरावर वणवा लागला होता. यावेळी काही झाडे जळून खाक झाली होती. त्यावेळी रात्री काही पर्यावरण प्रेमींनी आग आटोक्यात आणली होती. सिडको जलकुंभ शेजारील डोंगरावर वणवा लागला. या वेळी अॅड. जे. पी. खारगे, प्रितपाल सिंग आणि इतर काही व्यक्तींनी वणवा विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
खारघर आणि ओवे डोंगर परिसरातील वनसंपदा नष्ट होवू नये म्हणून डोंगरलगत असलेल्या आदिवासी पाड्यात सभा घेवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. त्यामुळे ग्रामस्थांकडून सहकार्य देखील मिळते. मात्र, निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणार्या डोंगरावर दरदिवशी अनेक पर्यटक येतात. काही लोक पर्यटकांच्या नावाखाली दारु पार्टी करताना सिगारेट पिऊन सिगारेट विझविण्याऐवजी फेकून पसार होतात. सदर प्रकार संध्याकाळी होतात. त्यामुळे आग विझविण्यात मोठी अडचण निर्माण होते. नागरिकांनी डोंगरावर आग न लावता वनसंपदा सुरक्षित राहावी यासाठी वन विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे, असे वन विभाग कर्मचार्यांनी सांगितले.