नागोठण्यातील फर्निचरच्या बंद गोडाऊनला आग

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील मुख्य रस्त्यालगत व येथील मरीआईच्या मंदिर परिसरात असलेल्या फर्निचरच्या जुन्या व बंद गोडाऊनला लागलेल्या आगीत जुने फर्निचर व इतर लाकडी सामानाचे नुकसान झाले आहे. ही आग शनिवार दि. 18 मार्चला सायंकाळी 7.30 वा. सुमारास लागली. मात्र सुप्रीम पेट्रोकेमिकल्स व जिंदाल कंपनीच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

लाकडी फर्निचरचे तत्कालीन प्रसिद्ध फर्निचर व्यावसायिक दिवंगत मांगीलालशेठ जैन यांच्या कुटूबिंयांचे हे फर्निचरचे जुने गोडाऊन आहे. यामध्ये दोन भाग असून एका मोठ्या भागात लाकडी जुने फर्निचर मोठ्या प्रमाणात भरून ठेवण्यात आले आहे. तर बाजूच्या दुस-या भागात असलेल्या जागेत थोड्या प्रमाणात असलेल्या लाकडी फर्निचरला व इतर सामानाला आग लागली. महत्वाची बाब म्हणजे या गोडाऊन मध्ये काही वर्षांपासून फर्निचर तयार करण्याचे काम बंद करण्यात आल्याने येथील वीजपुरवठाही बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ही आग लागली कशी हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान हे गोडाऊन अनेक वर्षे बंद अवस्थेत असल्याने येथील वस्तू चोरण्यासाठी स्थानिक भुरट्या चोरट्यांची वर्दळ असते. तसेच दारुडे व धुम्रपान करणारे यांचीही येथे रेलचेल असते. त्यातूनच एखाद्या दारूड्याकडून विडी-सिगारेटचे थोटुक या गोडाऊन मध्ये टाकल्याने ही आग लागल्याची शक्यता दिवंगत मांगीलाल जैन यांचे पुत्र निलेश जैन यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. या घटनेची नोंद नागोठणे पोलिसांकडून घेण्यात आली आहे.

Exit mobile version