30 ते 35 रहिवाशांचे सुखरूप स्थलांतर
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
उलवे नोड सेक्टर 17 येथील हायटेक कॅस्टल या 13 मजली इमारतीच्या मीटर रूममध्ये शनिवारी (दि.3) दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच उलवे अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मीटर रूममधून लागलेल्या आगीने संपूर्ण इलेक्ट्रिक डक्टमध्ये वेगाने फैलाव घेतला. त्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. अग्निशमन दलाने प्रथम विद्युत पुरवठा बंद करून बीए सेट परिधान करत बचावकार्य सुरू केले. फायर इंजिनच्या होज रीलच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला.
आगीची तीव्रता लक्षात घेता खारघर अग्निशमन केंद्राचे ब्रॉंटो स्कायलिफ्ट, उलवे फायर इंजिन तसेच द्रोणागिरी येथील अग्निशमन वाहने मदतीसाठी पाचारण करण्यात आली. पाच होज लाईन तयार करून जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत सोसायटीतील अंदाजे 30 ते 35 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे चार मांजरे आणि पाच कुत्र्यांनाही सुरक्षित रेस्क्यू करण्यात आल्याने रहिवाशांनी अग्निशमन दलाचे कौतुक केले.
प्राथमिक माहितीनुसार, सदोष विद्युत पुरवठ्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संपूर्ण वायरिंग जळाल्याने महावितरणच्या मार्गदर्शनानुसार पुढील काळात रहिवाशांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
