कळंब येथील भाताच्या मोळ्यांना आग

दीड लाखाचे नुकसान
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब येथील शेतकरी यांच्या शेतात गोळा करून ठेवलेल्या भाताच्या 300 मोळ्या लागलेल्या आगीत जळून गेल्या आहेत. नेरळ पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ताहीर अब्दुल अजीज लोगडे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब येथील ताहीर लोगडे यांची बोरगाव रोडला भातशेती असून सध्या भाताच्या पिकाची कापणी सुरू आहे. त्या पिकाची साठवण ताहीर लोगडे हे त्याच भागात करीत होते. सध्या भाताची कापणी सुरू असून दि.26 ऑक्टोबर रोजी ताहीर लोगडे हे सायंकाळी पाच वाजता आपल्या घरी परतले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यांच्या शेत जमिनीतील माळरानावर साठवून ठेवलेल्या भाताच्या मोळ्या यांना आग लागली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ग्रामस्थ बोरगाव रोड वरील शेतावर पोहचले, त्यावेळी भाताच्या दोन गंजी यांनी पेट घेतला होता. ग्रामस्थांनी आजूबाजूला शेतातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर आठ वाजता आग विझली आणि सर्व घरी परतले, परंतु रात्री धुराचे लोट यांचे रूपांतर आगीमध्ये झाले आणि पुन्हा आग भडकली आणि त्यात ताहीर लोगडे यांच्या भाताच्या 300 मोळ्या जळून खाक झाल्या.

त्याबद्दल स्थानिकांनी नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जतचे तहसीलदार यांना संपर्क साधला. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला रात्रीच घटनास्थळी पाठवले. तर तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तात्काळ पंचनामा केला जाईल असे आश्‍वासन दिले आणि नायब तहसीलदार यांच्याकडून ताहीर लोगडे यांच्या जळालेल्या भाताच्या मोळ्यांची पाहणी केली.नेरळ पोलिसांनी पंच प्रमोद कोंडीलकर आणि हमीद कोईलकर यांच्या उपस्थितीत जळालेल्या भाताच्या मोळ्यांचा पंचनामा केला. त्यात दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे.

Exit mobile version