तीन हजार क्विंटल भात भस्मसात
। ठाणे । प्रतिनिधी ।
आदिवासी विकास महामंडळाच्या घोळ येथील भात खरेदी केंद्रावरील गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तब्बल तीन हजार क्विंटल भात आणि 30 हजारांहून अधिक पोती भस्मसात झाली आहेत. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
एकीकडे पालघर जिल्ह्यातील शेतकरी आधीच संकटात आहेत. भात खरेदीच्या व्यवहारात काही घोटाळा झाला आहे का? याची चर्चा असून ही आग लागली की कोणी लावली? अशी ज्वलंत चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. दरम्यान, कासा पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
या आगीत गोडाऊनमधील सुमारे तीन हजार 70 क्विंटल भात आणि 30 हजारांहून अधिक बारदाने भस्मसात झाली. गोडाऊनमधून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अधिकार्यांना माहिती दिली. अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी तसेच डहाणू नगर परिषद, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.