| कर्जत | प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील विठ्ठल नगर येथील वृंदावन हेरीटेज सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 301 मध्ये बुधवारी (दि.14) रात्री 10च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे प्रचंड जोरात स्फोट झाला असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले. या आगीमध्ये वयोवृद्ध दांपत्य व त्यांचा नातु भाजले असून घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आगीमुळे जोरात स्फोट झाल्याने शेजारी तसेच इमारतीत राहणाऱ्या इतर तरुणांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवली. जखमी वृद्ध व त्यांचा नातु गौरव ठाकरे यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कर्जत पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारीही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच, फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरातील सिलेंडर टाकीचीही तपासणी केली. आग लागण्याचे कारण आणि स्फोट कशामुळे झाला, हे सध्यातरी समजु शकलेले नाही.