कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग

| महाड । प्रतिनिधी |
महाड नगरपरिषदेच्या लाडवली येथे असणार्‍या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला वणव्यामुळे आग लागल्याने या केंद्रातील कचरा तसेच कचरा प्रक्रियेच्या यंत्रसामग्रीचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही आग लागली होती. शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या लाडवली नगरपालिकेचे ओला व सुका कचरा विघटन प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण करून व विघटन केले जाते आणि त्यानंतर कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. सुमारे पाच टन क्षमता असणार्‍या या प्रक्रिया केंद्राच्या एका युनिटला वणव्यामुळे आग लागली.

शेजारच्या माळरानवर पेटत आलेला वणवा या प्रक्रिया केंद्रामध्ये शिरल्याने वर्गीकरण करून ठेवण्यात सुमारे तीन टन सुका कचर्‍याने आगीत पेट घेतला. कचरा पेटल्यानंतर ही आग वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली व प्रक्रिया केंद्राच्या इतर भागात देखील पसरली कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या सुमारे तीन यंत्रसामग्री यामध्ये जळून खाक झाल्या. त्यामुळे नगरपालिकेचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची घटना कळताच महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव स्वच्छता व आरोग्य विभागाचे अभियंता परेश साळवी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश पाटील व पालिकेच्या अग्निशामक दलाने या ठिकाणी तातडने रवाना झाले. सुमारे पाच तास प्रयत्न करून ही आग विझविण्यात आली.

Exit mobile version