जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात यंत्रणा कार्यान्वित
14 रुग्णालयांसाठी साडेसहा कोटींचा निधी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या 2 वर्षांत सरकारी आणि खासगी रुग्णालयात आगी लागून रुग्णालयात दाखल रुग्णाचे गेलेले प्राण आणि या आगीच्या घटनांमध्ये जखमी झालेल्याची मोठी संख्या हा अत्यंत चिंताजनक विषय बनल्यावर राज्य सरकाने खासगी आणि सरकारी रुग्णालयांचा अग्नी प्रतीबंधक लेखा-जोखा (फायर सेफ्टी ऑडिट ) करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात अपेक्षित अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे तर उर्वरित 14 रुग्णालयांसाठी साडे सहा कोटींचा निधी डीपीडीसीकडून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने यांनी दिली आहे.
रायगड जिल्हात या 15 रुग्णालयांमध्ये अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, माणगाव, पेण. कर्जत, रोहा, पनवेल, श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय तर उरण, चौक, महाड, कशेळे, जसवली, मुरुड, पोलादपूर व म्हसळा या ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. फायर ऑडीट झालेल्या या 15 रुग्णालयांपैकी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडीट नुसार अपेक्षित अग्निप्रतिबंधक यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 14 रुग्णालयांकरिता फायर ऑडीटनुसार अपेक्षित अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणीसाठी 6 कोटी 50 लाख 78 हजार रुपयांचा निधी रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सा डॉ माने ह्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त निधीतून या 14 सरकारी रुग्नालयांमध्ये फायर ऑडिट नुसार अपेक्षित यंत्रणा उभारण्याचे काम हे वीज पुरवठा व वीज वाहिन्या यांचे असून ते वीज वितरक कंपनीच्या पेण येथील कार्यकारी अभियंता यांच्या निगराणी खाली सद्यस्थितीत सुरु आहे. हे काम देखील येत्या काही दिवसात पूर्ण होऊन सर्व रुग्णालयेही फायर आणि सेफ्टी ऑडिटनुसार अपेक्षित अग्निप्रतिबंधक यंत्रणांनी सज्ज होतील.

डॉ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक



जिल्हा शल्यचिकित्सा यांच्या अधिकारकक्षेव्यतिरिक्त जिल्हात रायगड जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यकक्षेत एकूण 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी उपचाराकरिता रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही येथे येणार्‍या रुग्णाला दाखल करून घेणे गरजेचे झाले तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रातील सरकारी रुग्नालायात पाठविण्यात येते. परिणामी या 54 आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक अग्नीप्रतिबंधक यंत्रणेची गरज नसली तरीहि या सर्व ठिकाणी अग्नी प्रतिबंधक सिलेंडर (फायर एस्टीविषार) तैनात करण्यात आले आहेत. येथील सिलेंडर जुने व कालबाह्य झाले आहेत असे बदलून तेथे नवीन सिलेंडर बसविण्याचे काम सध्या सुरु असून या करिता शासनाकडून 10 लाखाचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ मोरे यांनी दिली आहे.
परिणामी येत्या काळात रायगड जिल्हातील सरकारी रुग्णालयात आग विषयक कोणत्या हि प्रकारची दुर्घटना मुळात घडणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे त्यातूनही आगीसारखी दुर्दैवी प्रसंग उद्भवला तर ती आग तात्काळ आटोक्यात आणण्याकरिता आवश्यक यंत्रणा सर्वत्र सज्ज ठेंवण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हात सुमारे 1200 खासगी रुग्णालये असून त्यांना देखील फायर ऑडीट करून घेऊन त्यानुसारच्या उपाययोजनाची अंमलबजावणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र आरोग्य विभागास सादर करण्याचे आदेश गतवर्षीच देण्यात आले होते. त्यानुसार या सर्व खासगी रुग्णालयांना देखील आपल्या रुग्णालयात आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ज्या रुग्णालयांनी अद्यापही अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वयित केलेली नाही अशा रुग्णालयाचा तपास करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची तजवीज देण्याची माहिती डॉ. माने ह्यांनी दिली.

Exit mobile version