खारघरमधील ट्रायसिटी सिम्फनी इमारतीला आग

। पनवेल । वार्ताहर ।

खारघर सेक्टर 34 सी नोडमधील ट्रायसिटी सिम्फनी इमारतीच्या मीटर रूममध्ये लागलेली आग सोळाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास झालेल्या चार व्यक्तींना खारघरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खारघर सेक्टर 34 सी मधील ट्रायसिटी इमारतीच्या मुख्य मीटर रूममध्ये आग लागली. इमारतीमधून धूर येत असल्याची माहिती रहिवासीयांच्या निदर्शनास येताच तत्काळ खारघर अग्निशमन दलाला कळवण्यात आले. डक्टमधून ही आग सोळाव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. यावेळी महावितरणकडून तत्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी सीडीच्या मदतीने वरच्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. दरम्यान यावेळी श्वसनाचा त्रास झालेल्या चार व्यक्तींना तत्काळ खासगी रुग्णालयात नेल्याची माहिती पनवेल महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी दिली. आगीत किरकोळ नुकसान झाले आहे. तर श्वसनाचा त्रास झालेल्या चार व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चारही व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान इमारतीत अडकलेल्या काही रहिवाशांना शीघ्र कृती दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले.

Exit mobile version