। ठाणे । प्रतिनिधी ।
बाळकुम परिसरातील छबय्या पार्कमधील एका फ्लॅटला रविवारी (दि.5) रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या आगीची तीव्रता इतकी होती की याच मजल्यावरील आजूबाजूच्या चार घरांना देखील त्याची झळ बसली. त्यामुळे या आगीत जवळपास पाच घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेत इमारतीमध्ये अडकलेल्या 40 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुमारे तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
ठाण्यातील बाळकुम येथे छबय्या पार्क येथे सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर राहणार्या काजल प्रसाद या भाडोत्री असून त्या घरी असताना रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास आग लागली. आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने आगीची झळ बाजूच्या खोल्यांनाही बसली. यादरम्यान, इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. या मजल्यावर अडकलेल्या जवळपास 40 नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आग रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागाचे वरिष्ठ अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.