धुरामुळे गावातील वातावरण भयभीत
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅलकेम इंडिया या बंद कारखान्यात शुक्रवारी (दि.20) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही तासातच ही आग आटोक्यात आणली गेली. मात्र, आगीचे कारण बेजबाबदारपणे होत असलेले भंगार तोडकाम असल्याचे समोर आले आहे. बंद अवस्थेतील या कारखान्यात गेली अनेक वर्षांपासून इतरस्त्र पसरलेले साहित्य आणि प्रचंड गवत असल्यामुळे लागलेल्या आगीची परिस्थिती नियंत्रणात आली नसती तर मोठी हानी झाली असती.
ही कंपनी बंद होऊन अंदाजे 10 वर्षे झाली आहेत. या कारखान्यात रसायनाने भरलेले ड्रम आजही त्या ठिकाणी आहेत. मात्र, हे ड्रम त्याच कारखान्याचे आहेत की इतर कोणाचे आणि त्यात कोणते रसायन आहे, हे अद्याप कळले नाही. मात्र, कंपनीत विविध ठिकाणी रसायनाने भरलेल्या गोणी, ड्रम तसेच पडून आहेत.धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक बंद कारखान्यात अशीच अवस्था आहे. त्यामुळे पावसाळ्यात यातील रसायन पाण्यामुळे बाहेर पडत असते. तर, उन्हाळ्यात तापमान अधिक वाढल्याने गवताबरोबर रसायनही पेट घेत असल्याच्या घटना घडत असल्याचे अनेक प्रसंग आहेत. याठिकाणी कारखाना बंद अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांची जनावरे या ठिकाणी वावरत असतात. त्याचा त्रास जनावरे आणि नागरिकांना होऊ शकतो. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. या बंद कंपनीत भंगार व्यावसायिक भंगार तोडण्याचे असुरक्षित काम करत आहेत. या कामगारांकडे कोणतीच सुरक्षा साधने दिसून येत नसल्याने कामगार सुरक्षा विभागाकडून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.




